मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावर वाहतूक कोंडीचे ग्रहण
वाकणनाका (सुनिल कोकळे)दि.३ एप्रिल
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड नाका परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत ही कोंडी अधिक तीव्र होत असून अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

सदरील रस्त्यावरील अपूर्ण कामे, अरुंद झालेला मार्ग, तसेच अवजड वाहनांची वाढती संख्या यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणा अपुरी पडत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.
या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक, प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या आठवड्यात शुक्रवार,शनिवार व रविवार लागून सुट्टी असल्याने मुंबईहून कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांमूळे वाहतूक कोंडी अधिक होत असल्याचे दिसून येत आहे.
यासाठी स्थानिक प्रशासनाने आणि वाहतूक पोलिस यांनी तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती करावी, रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

