मा. प्रवीण काकडे यांना ‘महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर
नागोठणे (शामकांत नेरपगार ) : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे धोंडेवाडी (ता. कराड, जि. सातारा) येथील मा. प्रवीण काकडे यांना आदिवासी धनगर साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने ‘महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील अहिल्यादेवी होळकर वाडा येथे दि.११ व १२ एप्रिल रोजी होणार आहे.
या सोहळ्यास प्रा. राम शिंदे (सभापती, विधान परिषद), मा. माजी आमदार रामहरी रुपनवर, श्रीमंत अमरजीत राजे जहागीरदार (तळोदा संस्थान, नंदुरबार), खासदार रामराव वडकुते (परभणी), मा. आमदार गोपीचंद पडळकर, डॉ. प्रकाश महानवर (कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ), संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर, बाळासाहेब कर्णवर पाटील (व्हाईस चेअरमन, सदगुरू साखर कारखाना, राजेवाडी) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रवीण काकडे हे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराडचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण काम केले आहे. विशेषतः कोरोना काळात त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर व सांगली या सात जिल्ह्यांतील दुर्गम डोंगर-दऱ्यातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम राबविला. ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले.
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. आतापर्यंत ५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत देऊन त्यांना शिक्षणात टिकून ठेवण्याचे कार्य काकडे यांनी केले आहे. तसेच कराड येथे एमपीएससी-यूपीएससी मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त २०२५ मध्ये कराड, पुणे व नवी मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर महिलांचा व विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. कराड येथे १४६, पुणे येथे ९० आणि नवी मुंबई येथे १४१ महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच कराड येथे २४५ विद्यार्थ्यांना ‘शिक्षण रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

“प्रवीण काकडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी २०१९ मध्ये ॲम्युनेशन फॅक्टरी, पुणे (भारत सरकार) यांच्याकडून ‘समाज रत्न’ पुरस्कार, २०२३ मध्ये एमआयटी कॉलेज, पुणे येथे ‘राष्ट्रीय जीवनगौरव’ पुरस्कार तसेच सिने अर्क प्रोडक्शन, मुंबईतर्फे ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.”
या नव्या राज्यस्तरीय पुरस्काराच्या घोषणेमुळे महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातील धनगर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

