लोकशाही दिनाकडे अधिकाऱ्यांची पाठ; रायगडमध्ये नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष — माजी आमदार पंडित पाटील संतप्त

लोकशाही दिनाकडे अधिकाऱ्यांची पाठ; रायगडमध्ये नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्षमाजी आमदार पंडित पाटील संतप्त

वाकणनाका (सुनिल कोकळे)

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाकडे प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या तातडीने निकाली काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमालाच अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बाधा येत असल्याने भाजप नेते तथा माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत घणाघात केला आहे.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीतून सुरू झालेल्या या उपक्रमाकडेच दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे लोकशाही दिनानिमित्त आपले प्रश्न मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

माजी आमदार पंडित पाटील यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत, लोकशाही दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी टाळाटाळ करतात, मात्र लोकप्रतिनिधींच्या बैठकींसाठी तत्पर असतात. ही बाब लोकशाही व्यवस्थेस अत्यंत घातक असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

 जिल्ह्यातील अनेक गंभीर प्रश्न अजूनही ऐरणीवरच 

या लोकशाही दिनानिमित्त जिल्ह्यातील अनेक गंभीर प्रश्न ऐरणीवर आले असून जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे ४०० कोटी रुपये खर्चूनही अनेक गावांमध्ये पाणीटंचाई कायम असल्याची तक्रार करण्यात आली. तसेच खारभूमी व कालव्यांचे प्रश्नही प्रलंबित असून खारआंबोली धरणाचे कालवे चक्क १५ ते २० वर्षांपासून रखडले आहेत, त्यामुळे हजारो हेक्टर जमीन अजूनही  नापीक आहे.त्याचबरोबर समुद्रकिनारी वसलेल्या गावांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कुर्डूस शिहू परिसरात अवैध्य वाळू उपसा: पंडीत पाटील 

याशिवाय कुर्डूस,शिहू ,बेणसे परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावरही यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला. नियमानुसार सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंतच उत्खनन अपेक्षित असताना नियम धाब्यावर बसवून काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांच्या बंधाऱ्यांना धोका निर्माण झाला असून महिनाभरापूर्वी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतरही कारवाई न झाल्याची तक्रार करण्यात आली.

लोकशाही दिनाला गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पंडित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, उपस्थित खनिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

सर्वसामान्य जनतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?

या संपूर्ण प्रकारामुळे रायगड जिल्हा प्रशासन खरोखरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहते का, असा प्रश्न उपस्थित होत असून लोकशाही दिनासारख्या उपक्रमाकडेच दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!