सण-उत्सव शांततेत साजरे करा; पोलिसांना सहकार्य करा – सपोनि रविंद्र पारखे
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : आगामी नारळी पौर्णिमा, ईद-ए-मिलाद आणि गोकुळाष्टमी हे सण-उत्सव शांततेत व गुण्यागोविंदाने साजरे करण्याचे आवाहन नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे यांनी केले. सणांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता नागोठणे पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना सपोनि रविंद्र पारखे बोलत होते.यावेळी भाजप नेते किशोरभाई म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, भाजप रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशपाक पानसरे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष अकबरशेठ पठाण, काझीम पानसरे, शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते बाळू रटाटे, असगर सय्यद, महिला दक्षता समितीच्या सुजाता जवके, राजेश्री टके, माजी सरपंच निलोफर पानसरे, नंदा गायकवाड, पोलिस कर्मचारी स्वप्नील भालेराव यांच्यासह शांतता व मोहल्ला समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील आणि पत्रकार उपस्थित होते.
सपोनि रविंद्र पारखे मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की, दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांची सुरक्षितता महत्त्वाची असून, उत्सव आयोजकांना गोविंदा पथकांची योग्य ती काळजी घेण्याबाबत लेखी सूचना दिल्या जाणार आहेत. नागोठणे शहर व परिसर नशामुक्त करण्यासाठी पोलिसांकडून जनजागृतीसोबतच कारवाई सुरू करण्यात आली आहे. गांजा व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, समाज अधिक चांगला घडविण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सपोनि रविंद्र पारखे यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या काळात सायबर क्राईमचे विविध प्रकार वाढले असून, नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अनोळखी व्यक्तीला ओटीपी, पासवर्ड अथवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती देऊ नये. ऑनलाइन फसवणूक झाल्यास नागरिकांनी विलंब न करता १९३० या क्रमांकावर तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन सपोनि रविंद्र पारखे यांनी केले. सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी सतर्क राहावे.
सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असून, सोशल मीडियाचा गैरवापर केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही सपोनि रविंद्र पारखे यांनी दिला. नागोठणे शहरातील रहदारीचा प्रश्न सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असून, यासाठी ग्रामपंचायतीचेही सहकार्य मिळत असल्याचे पारखे यांनी सांगितले. रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना मंडईमध्ये, तर मासळी विक्रेत्यांना मासळी मार्केटमध्ये बसविण्याच्या दृष्टीने प्रथम लेखी सूचना देण्यात येतील. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागोठणे शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहितीही सपोनि रविंद्र पारखे यांनी दिली.

