रोह्यातून १७ वर्षीय मुलगा बेपत्ता; मध्यरात्री घरातून गायब कुटुंबीयांकडून शोधाशोध; रोहा पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल

रोह्यातून १७ वर्षीय मुलगा बेपत्ता; मध्यरात्री घरातून गायब
कुटुंबीयांकडून शोधाशोध

रोहा पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : रोहा शहरातील दमखाडी परिसरातून १७ वर्षाचा आर्या सत्यवीर चौधरी हा मुलगा ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्याची आई अश्विनी सत्यवीर चौधरी यांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, रोहा पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान नागोठण्यातील प्रसिद्ध प्लम्बर अंकुश पाटील यांचा आर्या हा मावस भाऊ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी कुटुंबीय दमखाडी येथील जयराम बिल्डिंगमध्ये भाडेतत्त्वावर वास्तव्यास आहेत. दिनांक ९ सप्टेंबर रोजी रात्री कुटुंबीयांनी जेवण करून झोप घेतली. त्यानंतर रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास आई अश्विनी चौधरी यांना जाग आली असता मुलगा आर्या घरात दिसून आला नाही.
कुटुंबीयांनी त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचे दोन्ही मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात तसेच आर्याचे मित्र व नातेवाईकांकडे चौकशी करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
आर्या हा १७ वर्षे ११ महिन्यांचा असून त्याची उंची सुमारे १६७ सेंटीमीटर, रंग गोरा, चेहरा गोल, केस व डोळे काळे आहेत. बेपत्ता होताना त्याने हिरव्या रंगाचा फुल शर्ट, खाकी रंगाची पँट आणि पावसाळी बूट परिधान केले होते.

त्याच्याकडे आयफोन-१५ मोबाईल असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
आर्याचा कोणास काही ठावठिकाणा अथवा माहिती मिळाल्यास रोहा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन रोहा पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रोहा पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!