लायन्स क्लबच्या माध्यमातून नागोठण्यात अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्नशील राहू : लायन किशोरभाई जैन
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) :
नागोठणे लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणारे लोकहिताचे उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून, भविष्यात परिसरातील मोठ्या उद्योगसमूहांच्या सीएसआर निधीचा प्रभावी वापर करून नागोठण्यात अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा लायन किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला.

नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष विलास चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्त्या कै. अंजली गणपत जोगत यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र प्रसाद जोगत व शेखर जोगत यांच्या सौजन्याने, लायन्स हेल्थ फाऊंडेशन व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चोंढी (अलिबाग) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. ५ ऑगस्ट) रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यान, शांतीनगर, नागोठणे येथे आयोजित मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात किशोरभाई जैन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी लायन किशोरभाई जैन, अध्यक्ष विलास चौलकर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्यकारी अधिकारी डॉ. शुभदा कुडतळकर, चार्टर्ड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, एमजेएफ लायन यशवंत चित्रे, एमजेएफ लायन विवेक सुभेकर, सचिव डॉ. अनिल गीते, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जोगत, शेखर जोगत, लायन दौलत मोदी, लायन सखाराम ताडकर, लायन विजय शहासने, लायन दीपक गायकवाड, लायन दीपक लोणारी, लायन रतन हेंडे, लायन अनुराधा शहासने, लायन विद्या म्हात्रे, रविंद्र वाजे, डॉ. हिताली परब व त्यांची टीम तसेच नागोठणे शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना किशोरभाई जैन म्हणाले की, नागोठणे ग्रामपंचायतीमार्फत लायन्स क्लबला सामाजिक उपक्रमांसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यान उपलब्ध करून देण्यात आले असून, त्या विश्वासाचे चीज करत लायन्स क्लब सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाची शिकवण दिली होती; मात्र लायन्स क्लब शंभर टक्के समाजकारण करत असल्याचा मनापासून आनंद आहे,असेही किशोरभाई जैन यांनी सांगितले.
शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ६६ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४०
रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळून आला. या सर्व रुग्णांवर गुरुवार (दि. ६ ऑगस्ट) रोजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चोंढी (अलिबाग) येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात अध्यक्ष विलास चौलकर यांनी उपस्थितांना अनमोल असे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी केले.

