धामणसई आदिवासीवाडी येथे जागतिक आदिवासी दिनासाठी सहावारी साड्यांचे वाटप
वाकणनाका (प्रतिनिधी): रोहा तालुक्यातील रोहा शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील दुर्गम भागात असलेल्या धामणसई आदिवासीवाडीतील महिलांचा येत्या ९ ऑगस्ट रोजी येऊ घातलेला जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करावा या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते मंगेश दादा कोकळे यांच्या स्वखर्चातून आदिवासी महिलांना सहावारी साड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला आदिवासी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून विभागातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी महिलांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याच्या भावनेतून मंगेश दादा कोकळे यांनी शेकडो महिलांना सहावारी साड्यांचे वाटप केले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मंगेश दादा कोकळे यांनी सांगितले की, समाजातील वंचित व गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पुढील काळातही अशाच सामाजिक उपक्रमांद्वारे आदिवासी बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न सुरू राहील.
या कार्यक्रमास युवा कार्यकर्ते अनंत कोकळे, भगवान कोकळे, धाऊ कोकळे,लक्ष्मण शिंगाडे, चंद्रकांत कोकळे,प्रकाश कोकळे,संतोष कोकळे,अंकुश वाघमारे, लहू वाघमारे, रामदास वाघमारे, श्रावण वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमात महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

