दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसला नागोठण्यात पूर्ववत थांबा मिळणारच! खासदार सुनील तटकरे यांची ठाम ग्वाही; मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासह प्रवाशांच्या विविध सुविधांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे रेल्वे प्रशासनाचे संकेत

दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसला नागोठण्यात पूर्ववत थांबा मिळणारच!
खासदार सुनील तटकरे यांची ठाम ग्वाही; मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासह प्रवाशांच्या विविध सुविधांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे रेल्वे प्रशासनाचे संकेत

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसला पूर्वीप्रमाणे नागोठणे येथे थांबा मिळण्याची मागणी आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. “दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसला नागोठण्यात पूर्ववत थांबा मिळणारच,” अशी ठाम ग्वाही लोकनेते खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन, दिलीपभाई टके व नागोठणे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. याशिवाय हॉलिडे स्पेशल एक्सप्रेसलाही नागोठण्यात थांबा मिळावा, यासह रेल्वे स्थानकातील विविध प्रलंबित प्रश्नांवर खासदार तटकरे यांनी पुढाकार घेत गुरुवार (दि. ५ नोव्हेंबर) रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) तसेच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता झालेल्या या बैठकीत नागोठणे रेल्वे स्थानकाच्या विकासासह प्रवाशांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, दिलीपभाई टके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, नागोठणे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष हृषीकेश भोय, सल्लागार अॅड. महेश पवार, किसान तांडेल, राकेश गायकवाड, नारायण मढवी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

नागोठणे रेल्वे स्थानकासंदर्भात मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसला कोविड काळापासून बंद असलेला नागोठणे येथील थांबा पूर्ववत सुरू करणे, हॉलिडे स्पेशल एक्सप्रेसला थांबा देणे, तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ ची उंची वाढविणे या महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश होता. प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ ची उंची कमी असल्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, काही प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले आहे, तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या दोन्ही प्लॅटफॉर्मची उंची तातडीने वाढविण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ वर जाण्यासाठी पादचारी पूल मधोमध बांधण्यात यावा आणि भविष्यात ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्ध प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सरकते जिने उभारण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

याशिवाय नागोठणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट सुविधा सुरू करणे, प्लॅटफॉर्मवर डिजिटल इंडिकेटर बसविणे, रेल्वे गाड्यांच्या आगमन व प्रस्थानाबाबत उद्घोषणा (ट्रेन अनाऊन्समेंट) सुरू करणे आणि नागोठणे स्थानकातून एकदिवसीय टुरिस्ट पास उपलब्ध करून देणे, अशा विविध मागण्यांचे निवेदन रेल्वे प्रशासनासमोर मांडण्यात आले.

नागोठणे परिसराचे महत्त्व अधोरेखित करताना खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, नागोठणे हे अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून नागोठणे व परिसरातील सुमारे १०४ गावांतील नागरिक या स्थानकावर अवलंबून आहेत. या हजारो प्रवाशांच्या सेवेसाठी सध्या केवळ सहा रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. नागोठणे परिसरात रिलायन्स, सुप्रीम पेट्रोकेम, जिंदल यांसारखे मोठमोठे औद्योगिक प्रकल्प आहेत त्यामुळे हजारो कामगार कार्यरत आहेत तसेच नागोठण्यात भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या डिफार्मसी, बिफार्मसी, बीएएमएस, इंजिनीरिंग कॉलेज असल्यामुळे बाहेर गावाहून आलेले हजारो विध्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. नागोठणे परिसराचा सातत्याने विकास होत असल्याने येथील रेल्वे प्रवाशांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे इतर सुविधांसह दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसला पूर्वीप्रमाणे नागोठण्यात थांबा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याची ठाम भूमिका खासदार सुनील तटकरे यांनी मांडली.

यावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी खासदार सुनील तटकरे यांनी मांडलेल्या सूचनांबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन दिले. तसेच रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी वरिष्ठ स्तरावरून सकारात्मक धोरण अवलंबिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीनंतर खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, दिलीपभाई टके तसेच नागोठणे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसला नागोठण्यात पूर्ववत थांबा मिळणारच, असा ठाम विश्वास दिला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन व दिलीपभाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे प्रवासी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. खासदार सुनील तटकरे यांनी थेट मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत बैठक घेऊन या प्रश्नांना प्राधान्य दिल्याने नागोठणेकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. या पाठपुराव्याला आता निश्चितच यश मिळेल, असा विश्वास नागोठण्यातील प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.

याच बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी कर्जत, पेण, नागोठणे आणि रोहा या रेल्वे स्थानकांवरील विविध विकासकामे, प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांबाबतही सविस्तर चर्चा केली. या सर्व स्थानकांच्या विकासकामांना गती मिळून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खासदार सुनील तटकरे रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!