रखरखत्या उन्हात शाळांच्या वार्षिक परीक्षा; सरकारवर पालकांचा संताप

रखरखत्या उन्हात शाळांच्या वार्षिक परीक्षा; सरकारवर पालकांचा संताप

नागोठणे (शामकांत नेरपगार) दि. १५ एप्रिल :

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मंडळाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत इयत्ता पहिली ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा दि. ११ एप्रिलपासून सुरू झाल्या असून त्या २२ एप्रिल रोजी संपणार आहेत.

या परीक्षांमध्ये प्रगत मूल्यांकन चाचणी( PAT ) ही ११, १५ व २२ एप्रिल रोजी घेण्यात येत असून, दरम्यान इतर विषयांचे पेपर मधल्या कालावधीत घेतले जात आहेत.

मात्र काही पेपरांचे वेळापत्रक सकाळी ८ ते दुपारी ११ तर काही पेपर १  वाजेपर्यंत ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना रखरखत्या उन्हात शाळेत जावे लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहरातील शाळांमध्ये ये-जा करतात. काही विद्यार्थी पायी, काही सायकलने तर काहीजण एसटी बसने प्रवास करतात. त्यामुळे त्यांना कडक उन्हाचा तीव्र फटका सहन करावा लागत आहे.

दरम्यान, एकीकडे प्रशासन नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेमुळे अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करत असताना, दुसरीकडे विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत परीक्षा देण्यास भाग पाडले जात असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

त्यामुळे “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून स्थानिक पातळीवरील प्रशासनाने परीक्षांचे वेळापत्रक लवचिकता राखून बदल करावेत व परीक्षेची वेळ सकाळी करावी, अशी मागणी पालकांकडून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!