नागोठणेकरांची मोठी मागणी: एक्सप्रेस व स्पेशल गाड्यांना थांबा द्या!
नागोठणे (प्रतिनिधी) – नागोठणे परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी नागोठणे प्रवासी संघटनाने महत्त्वपूर्ण मागण्या पुढे केल्या आहेत. दिवा–सावंतवाडी एक्सप्रेस तसेच गणपती स्पेशल आणि हॉलिडे स्पेशल गाड्यांना नागोठणे स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
नागोठणे आणि परिसरातील सुमारे १०४ गावांतील नागरिकांना केवळ सहा गाड्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. रोहा–दिवा मार्गावरील पॅसेंजर गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेचे अध्यक्ष हृषीकेश भोय, सल्लागार अॅड. महेश पवार, सेक्रेटरी संदेश सुकाळे आणि सदस्य किसन तांडेल यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील धनराज नीला यांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.
आपल्या निवेदनात नागोठणे प्रवासी संघटनेने म्हटले आहे की, दिवा–सावंतवाडी पॅसेंजर (क्र. 10105-10106) गाडीचा पूर्वीप्रमाणे नागोठणे येथे थांबा सुरू करावा, गणपती स्पेशल व हॉलिडे स्पेशल गाड्यांना नागोठणे स्थानकावर थांबा द्यावा, दिवा–पेण (61019-61020) गाडीचा नागोठणेपर्यंत विस्तार करावा, प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ ची उंची वाढवून प्रवाशांच्या सुरक्षेची हमी द्यावी, आरक्षित तिकीट सुविधा नागोठणे स्थानकावर उपलब्ध करावी, संघटनेच्या म्हणण्यानुसार, कार्यक्षम वाहतूक ही विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून, दररोज १०० ते १७० किमी प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी रेल्वे सेवा अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती नागोठणे प्रवासी संघटनेने संघटनेने दिली असून, लवकरच योग्य तो निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

