जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलचे दहावी CBSE परीक्षेत घवघवीत यश: १०० टक्के निकालाची परंपरा कायम

जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलचे दहावी CBSE परीक्षेत घवघवीत यश: १०० टक्के निकालाची परंपरा कायम 

वाकणनाका (सुनिल कोकळे) दि. १७ एप्रिल- संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपल्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे अल्पावधीत नावारूपास आलेल्या नागोठणे जवळील सुकेळी येथील जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलचा इयत्ता दहावी चा निकाल नुकताच लागला. यावर्षीही विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या CBSE परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे शाळेचा निकाल १००% लागला.

  यावर्षी चाहित्य गोंडाणे याने ९६.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर गौरव राजपूत आणि चेरी राठोड यांनी प्रत्येकी ९६.२० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच आर्यन सोनावणे याने ९६.०० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक, तर शांभवी गुप्ता आणि कार्तिक जोशी यांनी प्रत्येकी ९५.८० टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळविला. तसेच मृदुला वाचकवाडे हिने ९५.४० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला.

  सदर इयत्ता दहावीच्या परीक्षेत एकूण ७२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी  २२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण, २० विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक, तर १६ विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांपेक्षा अधिक व ११ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक आणि ३ विद्यार्थ्यांनी ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. अशाप्रकारे शाळेचा एकूण निकाल १०० टक्के लागला.

जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलच्या या अदभुतपूर्व यशाबद्दल स्कूलचे सर्व व्यवस्थापक व पदाधिकारी, उप मुख्याध्यापक स्वागतिका साहू, शिक्षकवृंद आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!