जीवितहानीचा धोका टाळण्यासाठी नागोठण्यातील कमान जमीनदोस्त; नवीन सुसज्ज कमान लवकरच उभारणार
उपसरपंच अकलाख पानसरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
नागोठणे (शामकांत नेरपगार ) – नागोठणे हायवेवरून रिलायन्स कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावरील हजरत मिरा मोहद्दीन शाह बाबा यांच्या नावाने उभारलेली कमान अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ती जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अकलाख पानसरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नागोठण्याचे पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक उपस्थित होते.

सदर कमान 2008 साली तत्कालीन सरपंच विलास चौलकर यांच्या कार्यकाळात बांधण्यात आली होती. मात्र कालांतराने कमानीला मोठे तडे गेले होते, अक्षरे पुसली गेली होती आणि एकूणच रचना धोकादायक बनली होती. एप्रिलच्या सुरुवातीला एका अज्ञात ट्रकच्या धडकेमुळे स्थिती आणखी गंभीर झाली होती.
यासंदर्भात रोहा पंचायत समितीकडे कमान तोडण्याबाबत अर्ज करण्यात आला होता; मात्र परवानगीसाठी दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता असल्याने तातडीचा धोका लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला.
विशेष म्हणजे 5 व 6 एप्रिल रोजी नागोठण्यात होणाऱ्या प्रसिद्ध उरुसासाठी हजारो भाविक या मार्गाने ये-जा करणार होते. अशा वेळी कमान कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकली असती. हीच बाब लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यात आल्याचे पानसरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी आमदार अनिकेतभाई तटकरे व मार्गदर्शक किशोरभाई जैन यांनी रिलायन्स व्यवस्थापनाला नव्याने मजबूत व सुसज्ज कमान उभारण्याच्या सूचना केल्याचेही सांगण्यात आले. लवकरच नवीन कमान उभारली जाईल, अशी माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेत डॉ. मिलिंद धात्रक यांची उपस्थिती होती. काही ग्रामस्थ अपूर्ण माहितीतून गैरसमज पसरवत असल्याची खंत व्यक्त करत, नागोठणेकर नागरिक सुज्ञ असून सत्य समजून घेतील, असा विश्वासही यावेळी उपसरपंच अकलाख पानसरे यांच्या कडून व्यक्त करण्यात आला.

