ऐनघरजवळ अपघातात गायीचा मृत्यू; महामार्गावरील वाढत्या दुर्घटनांमुळे भीतीचे वातावरण
महामार्ग वाहतूक पोलीस वसुलीत व्यस्त असल्याचा नागरिकांचा आरोप
नागोठणे शहर ( शामकांत नेरपगार ) –
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग (क्र. ६६) या अत्यंत व्यस्त मार्गावर जनावरांच्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐनघर पोलीस चौकीजवळ नुकत्याच झालेल्या अपघातात एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नागोठणे परिसरातील सुकेळी, सुकेळी धनगरवाडा, ऐनघर, खैरवाडी, मांडवशेत आदिवासीवाडी, गणपतवाडी या महामार्गालगतच्या गावांमधील मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे अनेक अपघात घडत असून वाहनचालक आणि पशुपालक दोघेही त्रस्त झाले आहेत.
महामार्गालगत अनेक ठिकाणी कुंपण नसणे, अपुरी प्रकाशयोजना आणि वेगमर्यादेचे पालन न होणे ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. या अपघातांमध्ये केवळ जनावरांचेच नव्हे तर वाहनांचेही मोठे नुकसान होत असून काही ठिकाणी गंभीर जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, गेल्या ४ ते ५ वर्षांत १०० हून अधिक जनावरे (गाय, बैल, म्हैस) अपघातात मृत्युमुखी पडली असून तेवढीच जखमी झाली आहेत. संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास अपघातांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मुंबई–गोवा महामार्गालगत ऐनघर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलीस चौकीबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चौकीतील महामार्ग वाहतूक पोलीस वाहनचालकांकडून वसुलीतच अधिक लक्ष देत असून अपघात रोखण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.


