नागोठण्यात प्रियदर्शनी संस्थेच्या सभासदांवर उपासमारीची वेळ; लोकनेते खासदार सुनील तटकरे यांची रिलायन्स व्यवस्थापनाला तंबी – “स्थानिकांना काम द्याच!”

नागोठण्यात प्रियदर्शनी संस्थेच्या सभासदांवर उपासमारीची वेळ; लोकनेते खासदार सुनील तटकरे यांची रिलायन्स व्यवस्थापनाला तंबी – “स्थानिकांना काम द्याच!”

नागोठणे  – नागोठणे येथील प्रियदर्शनी चालक मालक वाहक सहकारी वाहतूक संस्थाच्या सभासदांवर उपासमारीची वेळ येण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली 30 वर्षे रिलायन्स (पूर्वी आयपीसीएल) कंपनीसाठी मालवाहतूक करणाऱ्या या संस्थेला सध्या कामात मोठी घट सहन करावी लागत आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील गीताबाग येथे लोकनेते रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना काम दिले जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.

निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेत खासदार तटकरे यांनी तत्काळ नागोठणे रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष शशांक गोयल यांच्याशी संपर्क साधत “स्थानिकांना प्राधान्य देऊन तात्काळ काम द्या” अशी कडक सूचना केली. त्यांच्या या हस्तक्षेपामुळे संस्थेच्या सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले. याचवेळी तटकरे यांनी नागोठणे जवळील आमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक आनंद वागळे यांनाही प्रियदर्शनी संस्थेला काम देण्याच्या सूचना केल्या.

या भेटीदरम्यान प्रियदर्शनी संस्थेचे मुख्य सल्लागार दिलीपभाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, हरिशशेठ काळे, संस्थापक मारुती देवरे, अध्यक्ष शैलेश रावकर, माजी अध्यक्ष विद्यमान संचालक बाळासाहेब टके, सिराजभाई पानसरे, सचिव शकील शेख, लियाकतशेठ कडवेकर, जितेंद्र जाधव, रमेश बोरगी यांच्यासह सभासद उपस्थित होते.

संस्थेने दिलेल्या निवेदनानुसार, रिलायन्स कंपनीत पूर्वी 60% काम मिळत होते मागील 2 वर्षांत 30% काम कमी झाले असून 148 सभासदांना पुरेसे काम मिळत नाही. सभासद पूर्णपणे रिलायन्स कंपनीवर अवलंबून असून ही परिस्थिती कायम राहिल्यास उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. संस्थेच्या मते, या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष व ईमेलद्वारे संपर्क साधूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे लोकनेते खासदार सुनील तटकरे यांच्याकडे न्याय मिळवण्यासाठी धाव घ्यावी लागल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नागोठणे येथील प्रियदर्शनी संस्थेच्या समस्यांबाबत लोकनेते खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देताना संस्थेचे मुख्य सल्लागार दिलीपभाई टके व इतर पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!