रायगडच्या चार विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील ६२ विद्यार्थ्यांची इस्रोत दमदार एन्ट्री गुरुकुल राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत रायगडचा दबदबा; चार विद्यार्थ्यांची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड

रायगडच्या चार विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील ६२ विद्यार्थ्यांची इस्रोत दमदार एन्ट्री

गुरुकुल राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत रायगडचा दबदबा; चार विद्यार्थ्यांची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड

नागोठणे (शामकांत नेरपगार) – गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रायगड जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील एकूण ६२ विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या शैक्षणिक सहलीसाठी निवड झाल्याची माहिती भाजप रोहा तालुका शिक्षण सेलचे अध्यक्ष अशोक अहिरे यांनी पत्रकारांना दिली.
                गुरुकुल एज्युकेशन सोसायटी ही संस्था इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सन २०११ पासून राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आयोजित करत आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच ही परीक्षा अशोक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. यासाठी पोलादपूर, कर्जत, खोपोली, उरण, खारघर ते पनवेलपर्यंत विविध भागांत दौरे करून शिक्षक व पालकांमध्ये स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले. परिणामी, रायगड जिल्ह्यातून तब्बल ३,६१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविला.
               दि. २५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धा परीक्षेत रायगड जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर विशेष यश मिळवत इस्रो भेटीसाठी मानाची निवड मिळवली आहे.
इस्रो भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी :
🔹 कु. सार्थक सुहास माने – इयत्ता ७ वी, सीकेटी इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू पनवेल
🔹 कु. विनीत विनोद कापसे – इयत्ता ८ वी, द. ग. तटकरे उच्च माध्यमिक विद्यालय, कोलाड
🔹 कु. साई योगेश म्हात्रे – इयत्ता ७ वी, रजिप पिगोंडे शाळा, नागोठणे परिसर
🔹 कु. शुब्रा सुधीर शिंदे – ग. बा. वडेर हायस्कूल, पाली
हे चारही विद्यार्थी गुरुवार, दि. ४ जून २०२६ रोजी इस्रोच्या शैक्षणिक सहलीसाठी रवाना झाले असून शुक्रवार, दि. ५ जून रोजी ते सुखरूप इस्रो केंद्रात दाखल झाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक व वैज्ञानिक ज्ञानवर्धनाच्या प्रवासाला सुरुवात झाली असल्याची माहिती अशोक अहिरे यांनी दिली.

“रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे पालक, शिक्षक व शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!