दहावीच्या परीक्षार्थींनी सोडला सुटकेचा निःश्वास;फटाके फोडत केला आनंदोत्सव साजरा
वाकणनाका (सुनिल कोकळे)
दि.१८ मार्च – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आयोजित इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा दिनांक२० फेब्रुवारी रोजी सुरू होऊन तिची सांगता दि.१८ मार्च रोजी झाली.
दरम्यान महिनाभर चाललेल्या या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा अभ्यास विद्यार्थी रात्रंदिवस करत होते. आपल्या आयुष्यातील शालेय जीवनातील इयत्ता दहावी परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे हे जाणणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांनी महिनाभर कसून अभ्यास केला. अशातच आपल्या कुटुंबियांच्या दबावामुळे आजूबाजूला होणाऱ्या विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नव्हते. हे विद्यार्थी केवळ अभ्यास करत होते. त्यामुळे त्यांना अभ्यासाच्या बंधनात अडकल्यासारखे वाटत होते. मात्र आज दिनांक १८ मार्च रोजी त्यांच्या शालेय जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचा पहिला टप्पा अर्थातच इयत्ता दहावी परीक्षा संपली असल्याने रोहा तालुक्यातील मेहेंदळे हायस्कूल केंद्राबाहेर सदरील विद्यार्थ्यांनी फटाके फोडत व एकमेकांना अलिंगन देत आनंदोत्सव साजरा करत सुटकेचा निःश्वास सोडला .
“यावेळी मेहेंदळे हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी आपले लाडके शिक्षक श्री कोकरे सर यांच्या सोबत फोटो काढत आनंदोत्सव साजरा केला व पुढील शिक्षणासाठी आशिर्वाद घेतले.”

